घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण : १०२० घरकुल लाभार्थ्यांना मिळणार प्लॉट
राजस्व अभियानात मिळणार लाभ
▶ विविध विभागांकडून संबंधित गावातील संबंधित गटांबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे. जमिनीच्या सर्वेक्षणाला सुरुवातही झाली आहे. पुढील आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर राजस्व अभियानात लाभार्थ्यांना जागा वाटपाचे पत्र देण्यात येणार आहे.
- जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ग्रामीण भागातील बेघर आणि गरीब कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. घरकूल मंजूर होऊनही स्वतःची जागा नसलेल्या जिल्ह्यातील ३४ गावांतील १ हजार २० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जागेच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
स्वतःचे घर नसलेल्या जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना विविध योजनांतर्गत घरकूल मंजूर केले. परंतु अनेक लाभार्थ्यांच्या नावावर जागाच नसल्याने घरकूल उभारणीत अडचणी येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे २३ मार्च २०२६ रोजी अशा लाभार्थ्यांना शासकीय जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),
रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना तसेच इतर योजनांतील घरकूल मंजूर लाभार्थ्यांपैकी जागेअभावी प्रलंबित असलेल्या प्रकणांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. यामध्ये ३४ गावांतील १०२० लाभार्थ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना जवळपास ३ लाख चौरस फूट शासकीय जमीन घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












